मुंबई – मुंबै बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रविण दरेकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत.
बोगस दस्ताऐवजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचे कर्जवाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. धस यांच्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि. आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले होते. मुंबै बॅंकेने या कर्ज प्रकरणात मोठी अनियमितता केलेली असून सर्व आर्थिक व्यवहार संशयास्पद आणि आर्थिक गैरवापर करण्याच्या उद्देशाने केल्याचा आरोप आहे.
बॅंकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तावेजांच्या आधारे 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररित्या वाटप केल्यामुळे कर्ज देणार व घेणार यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व अनियमितताअंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. राज्याच्या सहकार खात्याने हे आदेश दिले आहेत. हे कर्ज वाटप करण्यात आले, त्यावेळी प्रवीण दरेकर हे मुंबै बॅंकेचे अध्यक्ष होते. एका वाहिनीच्या संकेतस्थळावर ही बातमी देण्यात आली आहे.
प्रवीण दरेकरांनी आरोप फेटाळले
दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सुरेश धस यांच्या उद्योगांना सर्व कागदपत्रे तपासून नियमानुसार कर्ज वाटप केले आहे. सरकारने हवी ती चौकशी करावी, यामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टी झालेल्या नाहीत. राज्य सरकार केवळ राजकीय आकसातून कारवाई करत आहे, असे दरेकर यांनी संबंधित वाहिनीशी बोलताना म्हटले आहे. सुरेश धस यांच्या प्रतिस्पर्धी आमदारांनी आकसातून ही तक्रार दिली आहे. या गोष्टीची रीतसर उत्तरे दिली जातील, असे ते म्हणाले. हे आता रुटीन झाले आहे, अशा नोटिसा आता येतच असतात. सुरेश धस त्यांची बाजू सांगतील. काही अडचण नाही, असे दरेकर म्हणाले.