West Bengal : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा खलिस्तानी असा अवमानकारक उल्लेख केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांची माफी मागावी अशी मागणी पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बंगालमधील भाजप नेत्यांनी पोलिस अधिकारी आयपीएस जसप्रीत सिंग यांचा ज्याप्रकारे खलिस्तानी संबोधून अपमान केला आहे, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.
कदाचित या लोकांना बंगालची संस्कृती माहीत नसेल, बंगालमधील शीख समाज आणि बंगाली लोकांचे शतकानुशतके जुने नाते आहे. अशा कमेंटनंतर जसपीत सिंग यांना अपमानास्पद वाटले असेल, त्यांची वेदना मी समजू शकतो. आमची त्यांच्या समवेत संवेदना आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी पुर्णपणे उभे आहोत. भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी या अधिकाऱ्याला खलिस्तानी म्हणून हिणावले होते. त्याचा बंगाल पोलिसांनीही निषेध केला आहे. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाईचा निर्धार व्यक्त केला आहे.
आम्हाला शहाणपणा शिकवू नका- भाजप
पश्चिम बंगाल भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांना संदेशखली येथे जाऊ द्यावे असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने प. बंगाल सरकारला दिले होते. मात्र जसप्रीत सिंग यांनी न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला. त्यांना आपले काम करण्यापेक्षा राजकीय घटक म्हणून वावरण्यात अधिक स्वारस्य आहे. तृणमूल कॉंग्रेसनेच मुख्य विषयाकडून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी हा सगळा बनाव रचला असल्याचे भाजपने म्हटले आहे.
संबंधित अधिकारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हस्तक म्हणून काम करत आहेत. उच्च न्यायालयाचे विभागीय खंडपीठ एकल न्यायाधीशांच्या आदेशाला स्थगिती देईल अशी अपेक्षा या लोकांनी धरून हे सगळे केले असल्याचेही भाजपने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंग आपल्या टीमसह धमाखाली येथे तैनात होते. संदेशखली येथे जाण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या नेत्यांना रोखण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या नेत्यांशी बोलतानाच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मी पगडी घातली आहे म्हणून तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात. हेच शिकले आहात का तुम्ही? कोणी पोलीस अधिकारी पगडी घालत असेल आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असेल तर तुमच्यासाठी तो खलिस्तानी असतो का? तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे असे जसप्रीत सिंग संबंधितांना उद्देशून बोलताना दिसत आहेत.