पुणे : ऑक्सिजनगळतीमुळे नाशिक येथे घडलेल्या दुर्घटनेचे गाभिर्य लक्षात घेता, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी, खासगी कोव्हीड रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
नाशिकच्या दुर्घटनेनंतर राज्यातील विविध रुग्णालयांच्या फायर ऑडीट तसेच ऑक्सिजन प्लांटचे तांत्रिक तपासणी करण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. राज्य सरकारने त्याबाबत निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांना सूचना देणारे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहे. या संदर्भात नगरपालिका, नगरपंचायतींसह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोव्हीड केअर सेंटर, समर्पित कोव्हीड केअर सेंटर, समर्पित कोव्हीड रुग्णालयांमध्ये अग्निशामक साहित्य असणे आवश्यक आहे. हा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानातून व ग्रामपंचायत निधीमधून करण्यात यावा, असे सीईओ यांनी आदेशात म्हटले आहे. त्याबाबतचा अहवालही मागविला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सरकारी, खासगी कोव्हीड केअर सेंटर, समर्पित कोव्हीड रुग्णालय (डीसीएच), समर्पित कोव्हीड केअर सेंटर (डीसीएचसी) यांचे फायर ऑडीट करून घेण्यात यावे. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अग्नीशामक परिक्षण (फायर ऑडीट) करून घेण्यात यावे. तसेच अग्निशामक प्रशिक्षण व वापर हा पुणे महानगर विकास प्राधिकरण किंवा औद्योगिक विकास प्राधिकरण किंवा पालिका प्रशासनाच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात यावे, असे सीईओ यांनी सांगितले.