भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सूचना
पुणे – भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे आणि कार्यप्रणाली कार्यान्वित असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी आणि गेल्या 5 वर्षांत झालेल्या फायर अपघात आणि केलेल्या उपाययोजनांची माहिती 21 जानेवारीपर्यंत पाठवावी, असे आदेश राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
आरोग्य आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व जिल्हा परिषद यांच्यासाठी हे परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयांचा अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा घ्यावा, असेही म्हटले आहे.
“महाराष्ट्र फायर अँड प्रिव्हेंशन ऍक्ट 2006′ ची अंमलबजावणी सर्वच रुग्णालयांनी करावी, अशा सूचना आरोग्य विभागाकडून याआधी देण्यात आल्या आहेत. जिल्हा अग्निशमन प्राधिकरण यांच्या मदतीने सर्व आरोग्य संस्थांमध्ये “फायर सेफ्टी’च्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे फायर सेफ्टीबाबत प्रशिक्षण घेण्यात यावे. वर्षातून किमान एकदा मॉक ड्रील घेण्यात यावे, असेही या आदेशात नमूद आहे.
फायर ऑडिटसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, आग प्रतिबंधक उपकरणांची देखभाल, बांधकाम संरचना करणे, फायर सेफ्टी प्राधिकरणाचा ना हरकत दाखला घेणे आदी सूचनाही यात केल्या आहेत.