बंगळुरू – दक्षिणात्या चित्रपटसृष्टीतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला पोलिसांनी सख्ख्या भावाच्या हत्येप्रकरणी हुबळी येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनायाने भावाच्या मृतदेहाचे तुकडे करून रस्त्यावर फेकले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असं की, राकेश काटवे याचे कटलेलं शीर देवरागुडीहल येथील जंगलात आढळून आलं होतं. तर शरिराचे इतर तुकडे हुबळी आणि गदग रस्त्यावर सापडले. त्यानंतर धारवाड जिल्हा पोलिसांनी चार संशयीतांची पुष्टी केली आहे. यामध्ये नियाज अहमद कटिगार, तौसीफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले यांचा समावेश आहे.
राकेशची हत्या ९ एप्रिल रोजी त्याच्या राहत्या घरी झाली होती. या काळात शनाया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळी येथे गेलेली होती. तेव्हाच आरोपींनी राकेशची हत्या केली. त्यानंतर नियाज अहमद आणि बाकीच्यांनी एक दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे शहरात विविध ठिकाणी फेकले. याप्रकरणी पोलीस तपासात शनाया हिचेच नाव समोर आले आहे.
शनायाला भावाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. तिला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आलं. शनायाने राधवंका प्रभू दिग्दर्शित ‘इदम प्रेमम जीवन’ मधून आपल्या करियरला सुरुवात केली होती.