जानाई उपसाचे पाणी सोडण्याचे आदेश

दोन दिवसांत पाणी वरवंड तलावात पोहोचणार
पूर्व पुरंदरचा बराचसा भाग उपसा सिंचन योजनेवर अवलंबून
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आदेश

नायगाव – खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कालव्याद्वारे जलसंपदा विभागाने सुरू केला आहे. साधारणतः दोन दिवसांत हे पाणी वरवंड तलावात पोहोचेल. त्यामुळे जनाई उपसा सिंचन योजना तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. याचा लाभ पुरंदर तालुक्‍यातील नायगाव, राजुरी, रीसे, पिसे, पांडेश्‍वर या गावांना होणार आहे.

गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पूर्व भागातील शेतकरी संकटात सापडला होता. पूर्व पुरंदर परिसरात बराचसा भाग पुरंदर उपसा सिंचन योजनेवर अवलंबून आहे. तथापी बारामतीच्या शिवेला असलेल्या या गावांना जनाई योजनेतून सिंचनासाठी पाणी दिले जाते.

खडकवासला धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याचा लाभ घेऊन या गावांना पाणी देता येणे शक्‍य आहे हे लक्षात घेऊन राज्यमंत्री शिवतारे यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांना जनाई योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले असून पाणी सोडण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चालू वर्षी जनाई योजनेमधून पूर्व पुरंदरमधील सर्व गावांना समाधानकारक पाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. यासाठी आवश्‍यक ते नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्यमंत्री शिवतारे यांना केली होती. मी स्वतः यामध्ये लक्ष घालून पाण्याचे नियोजन करणार आहे.

गणेश मुळीक, तालुका समन्वयक युवासेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)