दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट

विशाल धुमाळ
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असल्याचे चित्र दौंड तालुक्‍यात पाहावयास मिळत आहे. मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी दौंड तालुक्‍यात पावसाला चांगली सुरुवात झाली होती, धरणक्षेत्रातही पाऊस चांगला झाला. कोरडी पडलेली भीमा नदीही भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून तालुक्‍यात आणि धरणक्षेत्रातही कोसळणारा पाऊस बंद झाल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात होणारी वाढ थांबली. पर्यायाने धरणातून नदीत सोडण्यात येणारे पाणी कमी झाले आणि पुन्हा एकदा दौंडमधील शेतकऱ्यांपुढे निराशा निर्माण झाली आहे.

सध्या दौंड तालुक्‍यात 2 हजार 767 हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये बाजरी पिकाचे प्रमाण जास्त आहे. बाजरीची 2361 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, आता पाऊस पडला नाही किंवा जर पाऊस लांबला तर मात्र बाजरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. तालुक्‍यात बाजरी 2361 हेक्‍टर, मका 118 हेक्‍टर, कडधान्य 84हेक्‍टर, तेलबिया 22 हेक्‍टर, कापूस 15 हेक्‍टर, चारा पीक 1022 हेक्‍टर असे एकूण 2767 हेक्‍टरवर पेरणी झाल्याचे शासकीय अहवालात दिसत आहे.

तालुक्‍यात ऊस लागवडीचे क्षेत्र सरासरी 6 हजार 440 हेक्‍टर आहे. मात्र, यंदा आजपर्यंत 2048 हेक्‍टरवरच उसाची लागवड झाली असल्याने फक्त 23 टक्के ऊस लागवड झाली आहे. काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यासाठी आपल्या शेतात सरी काढून ठेवलेली असून पाऊस आणि धरण भरण्याची वाट ते पाहत आहेत.

15 जुलैपर्यंत दौंड तालुक्‍यात फक्त 755 मिलिमीटर पाऊस झाल्याची सरकारी नोंद आहे. मागील वर्षी पाऊस खूप कमी झाला होता, तसेच धरण क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या शेतीलाही शेवटच्या काळात पाणी कमी पडले होते, त्यामुळे तालुक्‍यात उभा असणारा ऊस हा चाऱ्यासाठी म्हणूनच वापरला गेला. यंदा पाऊस असाच राहिला तर मात्र शेती क्षेत्रावर खूप मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे या पावसामुळे निर्माण झाली आहेत. पाऊस नसल्याकारणाने बी बियाणे, खते दुकानदारांचा व्यवसायही मंदावला असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)