ऑरेंज अलर्ट: तौते चक्रीवादळ मुंबईला धडकणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुळधार पाऊस

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले ‘तौक्ते’ चक्रीवादळ  गोव्यासह कोकणपट्टीत प्रचंड धुमाकूळ घालत मोठी पडझड करून वायव्येला गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत एनडीआरएफ पथक तैनात करण्यात आली असून, रविवारी रात्रीपासून मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा यासह इतर ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर पुढील काही तासांत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तौते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले, तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे. दरम्यान, चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.

हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.

पुणे जिल्ह्यालाही वादळाचा फटका बसला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या आणि नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील भोरगिरी आणि भिवेगाव परिसरात ७० घरांची पडझड झाली आहे. तर दोन अंगणवाड्या, प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. तिकडे रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून, आतापर्यंत तब्बल ८ हजार ३६० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.

शनिवारी रात्री आणि रविवारीही मुंबईतील अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने २८.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, रविवारी पावसाच्या सरींमुळे किमान आणि कमाल तापमानातही काहिशी घट झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.