राम तेरी गंगा मैली

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाराणसी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्या शहराचा अविभाज्य भाग असलेल्या गंगा नदीची सध्याची अवस्था “राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटच्या गाण्यातून व्यक्‍त होणाऱ्या विशेषणाला योग्य ठरेल अशीच आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या राज्यांतून गंगानदी वाहत आहे त्या राज्यांच्या काही भागांमध्ये गंगा नदीमध्ये मृतदेह सोडून देण्याचे प्रमाण वाढत असल्याच्या घटना समोर येत आहेत. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी अब्जावधी रुपये खर्च करण्याचे प्रकल्प सुरू झाल्यावरही या नदीची ही अशी अवस्था असेल तर नरेंद्र मोदी प्रशासन कोठेतरी कमी पडत आहे, असेच मानावे लागेल.

गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी “गंगा नदी स्वच्छता मिशन’ या विशेष प्रकल्पाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तो प्रकल्प जरी सुरू असला तरी प्रकल्पाचे प्रशासन पाहणाऱ्या लोकांच्या दुर्लक्षामुळेच अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत की काय, हे सुद्धा पाहावे लागणार आहे. गंगा नदीतून वाहत येणाऱ्या मृतदेहांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने “मिशन गंगा’च्या काही अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी या विषयाची खरी बाजूही समजून घेण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी जेव्हा “गंगा स्वच्छता मिशन’ची घोषणा केली होती तेव्हा गंगा नदी ज्या राज्यांतून वाहत आहे किंवा ज्या ज्या जिल्ह्यांमधून वाहत आहे त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना गंगा नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

पण सध्या सर्वच जिल्हाधिकारी करोना नियंत्रणाच्या कामांमध्ये व्यग्र असल्याने बहुदा त्यांचे या कामाकडे दुर्लक्ष झाले आणि पुन्हा एकदा गंगा नदीमध्ये मृतदेह सोडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी केलेल्या युक्‍तिवादाप्रमाणे गंगा नदीत मृतदेह वाहून नेणे यात वेगळे काही नाही. कारण ती आपली परंपरा आहे. मुळात अशा प्रकारे मृतदेह गंगा नदीत सोडून देऊ नयेत, अशा प्रकारचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता आणि अशा मृतदेहांवर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे आदेशही देण्यात आले होते.

तरीसुद्धा सध्याची स्थिती निर्माण होत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकते आहे. गंगा नदीत जर करोना महामारीने मृत्यू पावलेल्या लोकांचे मृतदेह टाकण्यात येत असतील तर त्यामुळे किती मोठा धोका निर्माण होणार आहे, ही गोष्टही लक्षात घ्यावी लागेल. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये अंत्यसंस्काराच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने गंगा नदीच्या किनारी राहणारे गरीब लोक अंत्यसंस्कारांचा खर्च परवडत नसल्याने आपल्या घरात कोणाचा मृत्यू झाला तर तो मृतदेह सरळ गंगा नदीत सोडून देतात.

मिळालेल्या माहितीनुसार चितेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडांचा खर्चही चौपट झाला आहे. जी लाकडे पूर्वी पाचशे रुपयांना मिळायची त्यासाठी आता 2 हजार ते 3 हजार रुपये मोजावे लागतात. त्याशिवाय संपूर्ण अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी दहा हजारांपेक्षा जास्त रुपयांचा खर्च येत असल्याने गंगाकिनारी राहणारे अनेक गरीब लोक आपल्या घरातील मृतदेह सरळ गंगा नदीत सोडून देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील खर्च सामान्य नागरिकांना परवडत नसल्याने अशा प्रकारे गंगानदीतच अंतिम संस्कार करण्याची पद्धत अवलंबली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृतदेह गंगा नदीत वाहून येत असल्याच्या घटना समोर आल्याने जागतिक पातळीवरही या विषयाची दखल घेण्यात आली आहे, हे विसरून चालणार नाही. गंगा नदीतून वाहत आलेले मृतदेह बाहेर काढून गंगा नदीच्या किनारी वाळूतच पुरले जातात ही गोष्टही चुकीची असल्याचे मत व्यक्‍त होत आहे.

सगळ्यांवर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करण्याची गरजही लक्षात घ्यायला हवी. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार जर कोट्यवधी रुपये खर्च करत असेल, तर त्यातील काही रक्‍कम या गरिबांना अंत्यसंस्कारांचा खर्च परवडत नाही त्यांना देण्यात आली तर गंगा नदी स्वच्छ राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हातभार लागू शकेल. गंगा नदीत मृतदेह फेकून देऊ नका, असा नियम करून काहीही साध्य होणार नाही. गरीब लोकांना जर अंत्यसंस्काराचा खर्च परवडत नसेल, तर ते सरकारचे या नियमांचे पालन करण्याच्या मनस्थितीत नसतात, हेही लक्षात घ्यावे लागेल आणि केवळ अंत्यसंस्काराचा खर्च परवडत नाही म्हणून जर गंगा नदीत मृतदेह फेकून देण्यात येत असेल तर गंगा नदी अस्वच्छ होण्याचे हे महत्त्वाचे कारण मानूनच सरकारला पावले उचलावी लागणार आहेत.

अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी सरकारने उचलली तर मृतदेह गंगा नदीत सोडून देण्याची प्रथा संपुष्टात येईल या व्यतिरिक्‍त केवळ एक धार्मिक परंपरा म्हणूनही समाजातील काही जण गंगा नदीत मृतदेह सोडून देतात त्यांचेही प्रबोधन करण्याची वेळ आता आली आहे. खरेतर गेल्या वर्षी देशात लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच या कालावधीत गंगा नदीचे पाणी सर्वात स्वच्छ झाले होते. नदीच्या प्रदूषणाची पातळी अत्यंत कमी झाली होती. याच वेळी फक्‍त अशाप्रकारच्या घटना का घडत आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी नेते यांनी हा विषय धार्मिक किंवा परंपरेचा करून काहीही साध्य होणार नाही.

गंगा नदी स्वच्छ आणि निर्मळ राहायची असेल तर त्यामध्ये इतर सर्व प्रदूषणकारी पदार्थ नदीत मिसळू नयेत म्हणून जेवढे प्रयत्न केले जातात तेवढेच प्रयत्न गंगा नदीत मृतदेह टाकले जाणार नाही त्यासाठी करावे लागणार आहे. पूर्ण जगामध्ये ज्या नदीची ओळख पवित्र नदी म्हणून आहे त्या गंगा नदीची अशाप्रकारची उपेक्षा मान्य होण्यासारखे नाही. नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणांमध्ये गंगा नदीचा उल्लेख करतात. ही नदी सर्वात महत्त्वाची आहे हे त्यांना माहीत असेल तर या नदीमध्ये अशाप्रकारे मृतदेह सोडून देण्याची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये “राम तेरी गंगा मैली’ अशा प्रकारची टीका यापुढेही झाल्याशिवाय राहणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.