Motor Vehicle Act – केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला ट्रक चालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या कायद्याविरोधात आज, सोमवारपासूनच संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे देशभरातील अनेक महामार्गावर चक्का जाम झाल्याचे चित्र होते. यामुळे देशातील अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो. दरम्यान, काही ठिकाणी ट्रक चालक आणि पोलिसांमध्ये वादविवाद झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याला ट्रक चालकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आज सोमवारपासून संप पुकारला असून, यामुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रांगाच रांगा लावत आहेत.
या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केले. सकाळच्या प्रहरात आंदोलन शांततेत सुरु झाले. पोलिसांनी रस्त्यावरील ट्रक बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.
मात्र दुपारी साडे बारा नंतर काही उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अटकाव करत असताना, समजूत काढत असताना काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष करीत काठ्यांनी हल्ला केला. यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या.
नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. ज्यात 1 ते 3 जानेवारीदरम्यान टँकरचालक संपावर असणार आहेत.
संपाचे महाराष्ट्रातही पडसाद
नवीन मोटार वाहन कायद्याबाबत ट्रकचालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. या कायद्याला देशभरातील टॅंकरचालकांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याचे पडसाद हरियाणा, पंजाब या राज्यात पडत असतानाच महाराष्ट्रातील नाशिकमधील टॅंकर चालकांनी संप पुकारला असून हे लोण राज्यातील इतर जिल्ह्यातही पसरत असल्याचे दिसून येत आहे.