नवी दिल्ली – अयोध्येत एकीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले आहे. ते म्हणाले जेथे आम्ही पाचशे वर्षे नमाज केली ती जागा (अयोध्या) आता आपल्याकडे नाही. तेथे आता काय काय होते आहे ते तुम्ही पाहतच आहात असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हटले आहे.
ओवेसी म्हणाले, या शक्तींना आपली एकजुट संपुष्टात आणायची आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आपण आज येथे पोहोचलो आहोत. त्यामुळे आपली ताकद सांभाळून ठेवा. यावेळी त्यांनी लोकांना मशिदींमध्ये नमाज पठण करण्याचे आवाहन केले. तरूणांनी आपल्या समुदायाची चिंता करावी आणि आपली शक्ती राखून ठेवावी. आमच्याकडून आणखी मशिदी हिसकावल्या जाणार नाहीत यासाठी मशिदी आबाद ठेवा.
सगळ्यांना एकजूट राखण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, कशाप्रकारे आपल्याला स्वत:ला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मोहल्ल्याला वाचवायचे याचा आजचा तरूण विचार करेल अशी आपल्याला आशा आहे. एकजूटही एक शक्ती आहे त्यामुळे एकजुट राहा असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदी यांना मुस्लिमांचा एवढा द्वेष का आहे? मशिदींचा राग का आहे, मशिदीतून येणाऱ्या आवाजांची त्यांना चीड आहे का असे सवालही त्यांनी उपस्थित केले.