पाचगणी पालिकेच्या सभेत विरोधी गटाचा गदारोळ

मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर; स्वच्छ सर्वेक्षणाचा विषय गाजला

पाचगणी  – पाचगणी नगरपालिकेच्या विशेष सभेत नुकत्याच बहुमतात आलेल्या विरोधी गटाच्या सदस्यांची तीन विषयांवर मुख्याधिकाऱ्यांबरोबर “तू तू मैं मैं’ झाली. विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, विजय कांबळे, पृथ्वीराज कासुर्डे, अनिल वन्ने यांनी केलेल्या गदारोळानंतरही मुख्याधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.

पाचगणी पालिकेची सभा नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष आशा बगाडे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगरसेवक विठ्ठल बगाडे, प्रवीण बोधे, सुलभा लोखंडे, दिलावर बागवान, रेखा कांबळे, रेखा जानकर, अर्पणा कासुर्डे, हेमा गोळे यांची उपस्थिती होती. सभेपुढे फक्त तीन विषय ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे “स्वच्छ सर्वेक्षण 2020′ मध्ये भाग घेणे व विविध कामांच्या मंजुरीचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला. त्यावरून गदारोळ झाला. वेगवेगळी कामे म्हणजे काय, याचा खुलासा करा, अशी मागणी अनिल वन्ने यांनी
केली.

मुख्याधिकारी उत्तर देत असतानाच नारायण बिरामणे, विनोद बिरामणे यांनी त्यांना रोखले. ठेकेदार चांगले काम करीत नाहीत, मागच्या वर्षी बनवले फुटपाथ उखडले आहे. ठेकेदार पेव्हर ब्लॉक चोरत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावरून अनिल वन्नेनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा गंभीर घटना होत असताना तुम्ही काहीच करत नाही. संबंधित ठेकेदार परस्पर काम करतोय. त्याला वर्क ऑर्डर दिली आहे का? त्यांना काळया यादीत टाका, असे वन्ने यांनी सुनावले. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी उत्तर दिले. दररोज शेकडो गोष्टी व्हायरल होतात, त्याचा जाब तुम्ही मला विचारणार का? या गोष्टींवर किती विश्‍वास ठेवायचा, हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. ठेकेदाराने चोरी केली असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार देऊ. संबंधित ठेकेदाराकडे वर्षाचा ठेका आहे.

माझ्या सांगण्यावरून ठेकेदार फुटपाथची दुरुस्ती करत आहे. आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना अडचणी येऊ नाहीत म्हणून पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती देत आहोत. शासकीय धोरणांनुसार निर्णय घ्यावा लागत असल्याने वेगवेगळ्या कामाची मंजुरी घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडे केल्याचे मुख्याधिकऱ्यांनी सष्ट केले. या स्पष्टीकरणानंतरही विरोधी गटाने या कामांबाबत खुलासा करण्याची मागणी केली. पाचगणी पालिका भोंगळ कारभाराने पहिल्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर फेकली गेल्याचे विरोधकांनी सांगितले.मागच्या वर्षी रंगवलेल्या भिंती पुन्हा धुण्यात येत आहेत. त्याची बिले पुन्हा निघणार का, असा सवाल विरोधकांनी केला.

आपसातील कुजबूज बंद करा
स्वच्छ सर्वेक्षणातील सहभाग व वेगवेगळ्या बाबींवर खर्चाच्या विषयावर विरोधी गटाने सूचना देऊन मतदानाची मागणी केली. हा विषय 13 मतांनी फेटाळण्यात आला. अडवणूक करण्याची भूमिका विरोधी गटाने घेतल्याची दावा नगराध्यक्षांनी केला. नगरसेवकांनी आपसात कुजबूज करू नये, असा इशारा नगराध्यक्ष कऱ्हाडकर यांनी दिला.

ठराव लिहिण्यासाठी “ब्रेक’
सभेत नारायण बिरामणे, विनोद बिरामणे, अनिल वन्ने यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांची नगराध्यक्षांबरोबरही चकमक उडाली. या सभेतील ठराव पूर्ण करण्याचा हट्ट विरोधी गटाने धरला. ठराव लिहिण्यासाठी चक्‍क “ब्रेक’ घेण्यात आल्याने सभा लांबली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)