लोकशाही वाचविण्यासाठी मोदींना रोखणे आवश्‍यक

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे : पोस्टर्सप्रकरणी अमित शहांवरही टीका

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाही प्रवृत्तीने वागत आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून देशातील लोकशाही धोक्‍यात आल्याने मोंदीना रोखणे आवश्‍यक आहे, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. याचबरोबर, सोलापूरमधील भाजपच्या सभेत “देश का दुसरा सरदार पटेल’ म्हणून अमित शहा यांचे फोटो लावले होते. मात्र, काश्‍मीरमधील 370 कलम रद्द केल्याने कोणी सरदार पटेल होत नाही, असा टोला शिंदे यांनी अमित शहांना लावला.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार रमेश बागवे यांना शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, महापालिकेचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, अभय छाजेड आदी उपस्थित होते.

कवाडे म्हणाले, “या देशातील सत्ताधाऱ्यांना पराभूत करायचे असल्यास मोठ्या विरोधी पक्षांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. यासाठी, सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना सांगून छोट्या पक्षांकडे लक्ष देण्यास सांगावे,’ अशी कोपरखळी कवाडे यांनी मारली.

देश हिंदूची मालमत्ता नाही. या देशावर सर्व जाती-धर्मातील लोकांचा अधिकार आहे. भाजपच्या काळात देशातील अल्पसंख्याक लोक असुरक्षित झाल्याने त्यांचे संरक्षण होण्याची गरज आहे. सद्यस्थितीत बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून आर्थिक नियोजनाची गरज आहे, असे अर्थतज्ज्ञ तथा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले.

वंचित आघाडीची धर्मांध शक्‍तीला मदत
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीत फाटाफूट होऊन एमआयएमबरोबर युती तोडली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने धर्मांध शक्‍तीला मदत केली. मात्र, आता एमआयएम वंचित आघाडीतून बाहेर पडल्याने आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितलेल्या विचारांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित करून कॉंग्रस कधी तोडफोडीचे राजकारण करत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.