मुंबई – महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, शिक्षण, तंत्रज्ञान सेवा आणि कृषी-अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण इ. क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी प्रिमियर आणि राज्य विकास, व्यापार आणि पर्यटन मंत्री रोजर कुक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे भारताचे पॉवर हाऊस आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा हिस्सा आहे. येथे विविध क्षेत्रासाठी चांगले वातावरण असून पायाभूत सोयी सुविधाही मोठ्या प्रमाणावर आहेत. महाराष्ट्र हे आगामी काही वर्षात कृषिसंपन्न राज्य व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान या विषयात काम करण्यास अधिक संधी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यात विकेंद्रित सौर वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. किमान 30 टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या क्षेत्रातदेखील सहकार्य करावे तसेच कोळशाचे वायुकरण या क्षेत्रातदेखील काम करण्यासाठी संधी आहे. महाराष्ट्र शासन आगामी काळात विविध विभागांतर्गत उपलब्ध असलेल्या संधी लक्षात घेऊन एक सर्वसमावेशक धोरण निश्चित करेल, असेही त्यांनी सांगितले.
रोजर कुक यांनी सांगितले, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. शेती व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी व काम करण्यासाठी तसेच आगामी काळात महाराष्ट्र व वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात येतील. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.