अकोले (प्रतिनिधी)- अगस्ती कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा शेतकर्यांनी अडविला. सीताराम गायकर यांच्या प्रचार सभेला जावू नये अशी विनंती केली. या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह काही शेतकर्यांना ताब्यात घेतले. अजित पवारांनी गायकर यांचा प्रचार करू नये, म्हणून घोषणाबाजी करणारे शेतकरी माजीमंत्री मधुकर पिचड यांचे समर्थक असल्याचा आरोप गायकर समर्थकांनी केला आहे.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. मात्र, ज्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत, त्या सीताराम गायकर यांच्यावर पवारांनी कधीकाळी जोरदार टीका केली होती. तर धोतर फेडण्याची भाषा वापरून आमदार लहामटे यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ज्यांनी मतदान केले, तेच शेतकरी गाडीच्या पुढे आडवे येत आम्ही तुमचे ऐकले, तुम्ही आमचे ऐका व परत जा, असे आवाहन केले. मात्र पोलिसांनी बळाचा वापरून आंदोलकांना बाजूला केले.
2019 ला मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांच्याविरोधात अजित पवारांनी अकोल्यात सभा घेतली होती. सीताराम गायकर यांचे धोतर फेडणार अशी वल्गना अजित पवारांनी केली होती. पण पुन्हा राष्ट्रवादीत गेलेल्या गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार आले. या गोष्टीचा जाब सभेच्या व्यासपीठावर जाऊन विचारणार असल्याचा निर्धार दशरथ सावंत यांनी दिला. या विरोधात पिचड समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवला.
अजित पवारांचा कार्यक्रमात जाऊन त्यांना जाब विचारू, अशी भूमिका दशरथ सावंत यांनी घेतल्याने आज सकाळी दशरथ सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या निषेधार्थ ताफा अडवल्यामुळे पोलिसांनी बळ वापरले. यावेळी शेतकर्यांनी सावंत यांना ताब्यात घेतल्याचाही निषेध केला आहे. ताफा अडवणारे शेतकरी पूर्वी आमदार लहामटे यांच्यासोबत असणारे व अलीकडे माजीमंत्री मधुकर पिचड समर्थक असल्याची माहिती आहे.