उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “महाजॉब्स पोर्टल’चे उद्‌घाटन

 

मुंबई – राज्यातील उद्योग-व्यवसायात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून हे पोर्टल सुरू करण्याचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. काळाची गरज ओळखून सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या “महाजॉब्स पोर्टल’चे ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले. हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचेही ठाकरे यांनी याप्रसंगी नमूद केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ठाकरे म्हणाले, महाजॉब्स हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे. पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्‍सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची, पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हेही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा. हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे, असे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.