नवी दिल्ली – सीबीआय मध्ये नियमीत स्वरूपातील संचालकांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून या प्रकरणी केंद्र सरकारने त्यांचे म्हणणे सादर करावे अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
कॉमन कॉज नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने ही याचिका केली आहे. दिल्ली स्पेशल पोलिस ऍक्टमधील कलम 4 ए नुसार सीबीआयला स्वतंत्र संचालक असला पाहिजे अशी तरतूद आहे. विद्यमान संचालक श्रृषीकुमार यांची मुदत 2 फेब्रुवारी रोजी संपली असली तरी केंद्र सरकारने तेथे त्यांच्या जागी अजून सीबीआय संचालक नेमलेला नाही. तो त्वरीत नेमावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने अंतरीम संचालक म्हणून प्रविण सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. त्याऐवजी तेथे नियमीत स्वरूपाचा संचालक नेमला पाहिजे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. नियमीत स्वरूपाचा संचालक तेथे नेमलेला नसल्याने या महत्वाच्या संस्थेच्या कारभारावर त्यामुळे विपरीत परिणाम होत आहे असा युक्तिवाद आज याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍडव्होकेट प्रशांत भुषण यांनी केला. यावर केंद्र सरकारचा अभिप्राय आल्यानंतर दोन आठवड्याच्या मुदतीत पुन्हा सुनावणी घेण्यात येईल असे सुप्रीम कोर्टाने नमूद करीत आजची सुनावणी तहकुब केली.