पुणे – शहर पोलीस दलाच्या ’ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत शुक्रवारी रात्री 1625 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली त्यापैकी 775 गुन्हेगार मिळून आले. त्यातील दोघांकडे 1 गावठी कट्टा आणि 4 काडतुसे तसेच इतर गुन्हेगारांकडे कोयते, तलवार आणि चाकु असे हत्यार आढळून आले आहेत. पोलिसांनी 30 जणांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. तसेच तपासणी दरम्यान विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत फरार असलेल्या तीघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून शहर हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात ऑरेशन ऑल आउट अंतर्गत गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि कर्मचार्याचे पथके स्थापन करून शुक्रवारी दि. 8 ऑक्टोबर रोजी रात्री 9 नंतर गुन्हेगार तपासणीला सुरूवात करण्यात आली.
शनिवारी दुपारपर्यंत ही मोहिम सुरू होती. पोलिसांनी 1625 गुन्हेगारांची तपासणी केली असता 775 गुन्हेगार मिळून आले. त्यामध्ये दोन आरोपींना अटक करीत त्यांच्याकडे 1 गावठी कट्टा आणि 4 कडतुसे जप्त केली. तसेच 21 कोयते, 8 तलवार आणि 1 चाकुही आढळून आले. सदर शस्त्र हत्यारे जप्त करून तीस जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हेगारांच्या तपासणीदरम्यान, गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने लोणीकाळभोर पोलीस?ठाण्यात दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी राहुल संजय क्षीरसागर याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील अमोल रमेश गालफाडे (वय 25) याला अटक केली आहे.
खंडणी विरोधी पथक 1 ने लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील लक्ष्मण अण्णा धोत्रे यास अटक केली. यासह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत शुभम मिलिंद कुलकर्णी व अफाक अश्फाक शेख यांना अटक करून त्यांच्याकडून 452 ग्रॅम्स वजनाचा गांजा, मेफेड्रोन, मोटारसायकल, वजनकाटा असा 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारून गावठी दारू, देशी दारूच्या बाटल्या, जुगाराचे साहित्य जप्त करीत 17 जणांना अटक केली. यासह शहरातील 23 हॉटेल्स व लॉजेसची तपासणी करण्यात आली आहे.