नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी लिटरमागे पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत अनुक्रमे 30 आणि 35 पैशांची वाढ केली. त्यामुळे मुंबईत पेट्रोलपाठोपाठ डिझेल दरानेही 100 रुपयांची पातळी ओलांडली. आता डीझेल दराची शंभरी पार करणारे मुंबई हे देशातील पहिले महानगर ठरले आहे.
सार्वजनिक कंपन्यांनी इंधन दरवाढीचे सत्र सुरूच ठेवल्याने सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डीझेल महागले. त्यामुळे पेट्रोलचा दर दिल्लीत 103.84 रुपये, तर मुंबईत 109.83 रुपये इतका झाला आहे. मुंबईत आता एक लिटर डीझेलसाठी 100 रु. 29 पैसे मोजावे लागणार आहेत. दिल्लीत डीझेल 92.47 रुपयांवर पोहोचले आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे देशाच्या अनेक भागांत पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीने प्रथम शतक ठोकले आहे.
सार्वजनिक कंपन्यांनी मागील महिन्यात सुमारे तीन आठवडे दोन्ही इंधनांच्या दरांत कुठला बदल केला नाही. त्या विश्रामानंतर 24 सप्टेंबरपासून डीझेल, तर 28 सप्टेंबरपासून पेट्रोल दरवाढीचे सत्र सुरू झाले. तेव्हापासून पेट्रोल 2 रुपये 65 पैशांनी, तर डीझेल 3 रु. 85 पैशांनी महागले.