#TokyoOlympics : लसीकरणानंतरच ऑलिम्पिक होणार

टोकियो  – ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा संभ्रम दरदिवशी वेगवेगळे संकेत देत आहे. एकीकडे जपान सरकार, जपान ऑलिम्पिक संघटना या स्पर्धेच्या आयोजनाची ग्वाही देत आहेत. तर, दुसरीकडे देशातील नागरिकांचे करोनाबाबत संपूर्ण लसीकरण झाले तरच ही स्पर्धा बिनधोकपणे होईल, अन्यथा स्पर्धा पुन्हा एकदा लांबणीवर टाकली जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

एक वर्ष पुढे ढकलल्या गेलेल्या ऑलिम्पिक ( Tokyo Olympics )स्पर्धेचे आयोजन कणत्याही स्थितीत होणार असल्याचे सरकार व संघटना सांगत आहेत. मात्र जवळपास 13 कोटी लोकसंख्येच्या या देशामधील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अनिश्‍चितता असल्याने ऑलिम्पिकबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात करोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. देशी लशीची प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत असल्याने जपानची फायझर, ऑस्ट्राझेनेका आणि मॉडर्ना या परदेशी औषध कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. यापैकी फायझरशी करार होण्याची शक्‍यता असल्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द होण्याच्या अफवांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी फेटाळून लावले आहे.यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जपानमधील करोनाची स्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने या वेळी देखील ऑलिम्पिक रद्दच करावे लागेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, यात तथ्य नसून अशा वृत्तांवरर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही बाख केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.