ऑनलाइन भाडेकरार फसवणूक टळणार

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून “लॉगिन मॉनिटरिंग सिस्टिम’

पुणे -ऑनलाइन भाडेकरार करताना केंद्र चालकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने “लॉगिन मॉनिटरिंग सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे भाडेकरार नोंदविता जुन्याच दस्तांचा क्रमांक टाकून भाडेकराराची प्रत देण्याचा केंद्र चालकांच्या या प्रकाराला आळा बसणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन भाडेकरार नोंदणी कोणी केली, किती पैसे घेतले याचा शोधही या सिस्टीममुळे लगेच घेता येणार आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने भाडेकरार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांना भाडेकरार नोंदविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात येण्याची आवश्‍यकता नाही. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होते. आता पासपोर्ट, वाहन परवाना, कर्ज, विविध प्रकारचे दाखले आदींसाठी संबंधित विभागाकडून नोंदविलेल्या भाडेकराराची प्रत मागितली जाते. त्यामुळे भाडेकरार नोंदवून घेण्यासाठी केंद्र चालकांकडे गर्दी होते. याचा फायदा घेत शहरातील काही केंद्रचालकांनी जुन्या दस्ताचा क्रमांक भाडेकरार टाकून त्या भाडेकराराची प्रत नागरिकांना दिली जाते. प्रत्यक्षात तपासणी केल्यानंतर तो दस्त नोंदविलेला नसतो.

ऑनलाइन भाडेकरार नोंदविताना सदनिकाचे मालक आणि भाडेकरू यांचा फोटो काढण्यात येतो. तसेच बायोमेट्रिक मशीनवर दोन्ही व्यक्‍तींच्या बोटांचे ठसे घेतले जातात. मात्र, काही केंद्रचालक जुनाच भाडेकराराची कॉपी काढून घेत. त्यावरील फोटो काढून दुसऱ्या व्यक्‍तींचे फोटो चिटकावतात. परंतु, त्यावरील व्यक्‍तीच्याच बोटांचे ठसे बदलता येत नाही. मात्र, नागरिकांना या बाबींची माहिती नसते. तसेच, ते भाडेकरार दस्त बारकाईन पाहत नाही. आपल्या बोटांचे ठसे घेतलेच गेले नाही, असा प्रश्‍नदेखील त्यांच्या मनात उपस्थित होत नाही. पुरेशा माहिती अभावी हा दस्त खरा की खोटा हे त्यांना कळत नाही. त्यातून ते अडचणीत येतात. असे काही प्रकार शहरात मध्यंतरी उघडकीस आले. याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडेदेखील तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची दखल घेऊन या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी लक्ष ठेवणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.