जम्मू-काश्‍मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून जम्मू-काश्‍मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर देशात पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सध्या जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाचे अजूनही ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरु आहे. काश्‍मीर खोऱ्यातील गांदरबलमध्ये चकमकीदरम्यान सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. लष्कर आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. सकाळी सुमारे 7 पासून चकमक सुरु झाली.

मंगळवारी सकाळी गांदरबलमधील गुंड परिसरातील एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तिथे जाऊन परिसराला घेराव घातला आणि दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु केले. या दरम्यान घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. यात लष्काराचा एक जवान जखमी झाला आहे. घरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.