सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले कार्यच आपण करत आहोत हे निश्चितच अभिमानास्पद आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा आहेत. त्याचा वापर करून करोनाबाधितांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रयत्नात राहा.
इथून पुढे लस कधी का येईना आपण करोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या मास्क, हात धुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रींचा वापर करून आपल्याला या प्रादुर्भावापासून दूर ठेवू या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्याला 45.59 कोटी निधी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या आज झालेल्या ऑनलाइन उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे ऑनलाइन सहभागी झाले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले,
आ. जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, कोविड हॉस्पिटल उभारणीत मदत करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. अवघ्या 20 दिवसांत अतिशय चांगल्या सुविधा असलेले कोविड हॉस्पिटल उभं केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “जगभरातील देशात लाट ओसरली ओसरली म्हणता म्हणता दुसरी करोना प्रादुर्भावाची लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहून काम करावं लागेल. माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम आपण लोकांना या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यासाठी राबवत आहोत.’ लोकप्रतिनिधी, प्रशासन या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरत प्रयत्न करीत असल्याचा उल्लेख करून खासगी हॉस्पिटलच्या एक लाखाच्या पुढच्या बिलाचे ऑडिट करावे, त्यावर लक्ष ठेवून राहा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. पुणे विभागाला करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनांसाठी 151 कोटी दिले असून पाच जिल्ह्यांपैकी सातारा जिल्ह्याला 45कोटी 59 लाख रुपये दिल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली. विविध साथीच्या रोगाबरोबर आपण राहयला शिकलो तशीच काळजी घेऊन करोना बरोबर राहू या, लस येईल तेंव्हा येईल आपण हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी पाळून यावर विजय मिळवू, असा आशावाद विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. हॉस्पिटल सुरु होईल, सर्व साधनांची पूर्तता होईल.
पण डॉक्टर आणि नर्सेस यांची सेवा अधिक गतीने होण्याची गरज असून मृत्यूदर कमी करण्याबरोबर अधिकाधिक ट्रेसिंग करणे गरजेचे आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कृष्णा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये अजून ऑक्सिजनचे बेड वाढू शकतात, त्या संस्थेला सांगून ती क्षमता जिल्ह्यासाठी महत्वाची ठरेल, असेही टोपे यांनी नमूद केले. कोविड हॉस्पिटल उभं करण्यासाठी शासनाने अतिशय तत्परतेने मदत केल्याचे सांगून जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गेल्या पाच महिन्यांतील अनुभव लक्षात घेऊन हे हॉस्पिटल उभे केले. इथे डायलेसिसच्या व्यवस्थेचे चार बेडही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड हॉस्पिटल उभं करण्यासाठी तत्परतेनी परवानगी दिली. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने अतिशय कमी काळात सुसज्ज असं हॉस्पिटल उभं केल्याचे सांगून गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. कोविड हॉस्पिटलची उभारणी, उपलब्ध सुविधा, लागलेला निधी याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. यानंतर कोविड हॉस्पिटलवर बनवलेली चित्रफित दाखविण्यात आली. हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी जिल्ह्यातील आणि बाहेरील संस्था आणि व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा गौरव करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आभार मानले.