चेन्नई – भारताचा ग्रॅंडमास्टर निहाल सरिन, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी आणि डी. गुकेश यांनी फिडे ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.
निहाल याने अर्मेनियाचा ग्रॅंडमास्टर शांत सर्गस्यान याचा 18 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत 1.5-0.5 असा पराभव केला. रक्षिताने मुलींच्या 16 वर्षांखालील गटात चीनच्या सॉंग युक्सिन हिच्यावर 1.5-0.5 अशी सरशी साधली.
गुकेशने मुलांच्या 14 वर्षांखालील गटात वोलोडार मुरझिन याचा 2-1 असा पराभव करत जेतेपद पटकावले. पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर 16 वर्षीय निहालने 58 चालीपर्यंत लढत देत दुसरा डाव जिंकला.
रक्षिताने पहिला डाव बरोबरीत सोडवला. त्यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या 39 चालींत विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.