टोमॅटो 7 रुपये किलो; कांद्याची दरवाढ सुरूच
पिंपरी – खरीप हंगामात टोमॅटोचे दर यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे, सध्या घाऊक बाजारात टोमॅटो 7 रुपये किलो दराने मिळत आहेत. तर मागील काही दिवसांपासून सुरु असलेली कांद्याची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याला सफरचंदाचा भाव मिळू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी सर्वसामान्यांना मात्र हा कांदा रडवू लागला आहे.
मागील वर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कांद्याचे दर घसरले होते. घाऊक बाजारात कांद्याला केवळ 1 रुपया दर मिळाला होता. त्यामुळे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यावर्षी मात्र, कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.
एरव्ही, किरकोळ बाजारात कांदा 10 ते 15 रुपये, तर सफरचंद 70 ते 100 रुपये किलो दरम्यान विक्री होत असते. मात्र, मागील काही दिवसात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वधारले आहेत तर सफरंचदाचे दर कमी झाले आहेत.
या आठवड्यात मोशी येथील उपबाजार समितीमध्ये कांद्याची आवक या आठवड्यातही घटली त्यामुळे कांदा किमान 25 रुपये ते कमाल 40 रुपये किलो दराने विक्री झाला.
तर किरकोळ बाजारता हेच दर 50 ते 60 रुपयांच्या घरात गेले आहेत. तर देशी सफरचंदाचा हंगाम सुरु असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात कश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आवक सुरु आहे. यावर्षी सफरचंदाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे सफरचंदाचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे, देशी सफरचंद घाऊक बाजारात 4 हजार ते 7000 रुपये प्रतिटन प्रमाणे विक्री होत आहे. किरकोळ बाजारातही सफरंचदाची 60 ते 100 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे.
टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण
खरीप हंगामात लागवड केलेले टोमॅटो मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झाली असून टोमॅटाचे 6 ते 7 रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला घाऊक बाजारात 100 ते 120 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.