प्राप्तिकर विभागाची निवृत्त आयएएस अधिकारी नेतराम यांच्यावर कारवाई
नवी दिल्ली – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी नेतराम यांची तब्बल 230 कोटी रूपयांची बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली. बसपच्या प्रमुख मायावती उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री असताना नेतराम यांनी त्यांचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
नेतराम यांच्या 19 स्थावर मालमत्तांवर टाच आणली गेली. त्या मालमत्ता मुंबई, दिल्ली, नोएडा आणि कोलकत्यातील आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता निवासी आणि व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. मायावती मुख्यमंत्रिपदी असताना नेतराम यांनी महत्वाच्या सरकारी पदांवर कार्य केले. बेनामी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून नेतराम प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले. त्यानंतर चालू वर्षी मार्चमध्ये त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
त्यावेळी 1 कोटी 64 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याशिवाय, 50 लाख रूपयांचे महागडे पेन, 4 लक्झरी वाहनेही हस्तगत करण्यात आली. नेतराम यांच्याकडे सुमारे 300 कोटी रूपयांची बेनामी मालमत्ता असल्याचे स्पष्ट करणारी काही कागदपत्रे त्यावेळी सापडली.