विजय लाड
कोयनानगर – अदानी समुहाला वीज वितरण परवाना देण्यास महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानुसार वीज खासगीकरणाच्या विरोधात मंगळवार दि. 3 रोजी मध्यरात्रीपासून आधिकारी व कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. याचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी दिसत असला तरी कोयना जलविद्युत प्रकल्पातून अखंडितपणे वीजनिर्मिती सुरूच असल्याने कोयना परीसरातील बत्ती गुल झाली नसल्याचे चित्र आहे.
अदानी पॉवर कंपनीने राज्यात वीज वितरण करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक मंडळाकडून परवाना मिळवला आहे. परंतु, राज्य सरकारने याला अद्याप परवानगी दिलेली नाही. अदानी पॉवर कंपनीला ती परवानगी देऊ नये, यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना मिळाल्यास सामान्य ग्राहक व शेतकऱ्याना वीज मिळवणे कठीण होणार असल्याची भिती वीज कर्मचारी व अधिकारी घालत असून त्यांनी तीन दिवस संपाची हाक दिली आहे.
या संपामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वीज वितरण व्यवस्था प्रभावित झाली आहे. परंतु, कोयना जलविद्युत प्रकल्पावर या संपाचा परिणाम जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. दोन हजार मेगावॅट क्षमता असणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चारही टप्प्यातून वीजनिर्मिती अखंडितपणे सूरू असल्याचे महानिर्मिती कंपनीने स्पष्ट केले आहे.
पायथा वीजगृहाचा संपाशी सबंध नाही
अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह कोयना जलविद्युत प्रकल्पाचे सर्व संच कार्यान्वित असून त्यामधून एक हजार मेगावॅट या कमी क्षमतेने विजनिर्मिती होत आहे. कोयनेचा ३६ मेगावॅट क्षमतेचा पायथा वीजगृह सिंचनाला पाणी सोडल्यावर वीजनिर्मितीसाठी चालू असतो. सध्या सिंचनासाठी पाणी सोडणे बंद असल्याने हा प्रकल्प बंद असून त्याचा व या संपाचा काहीही सबंध नाही.