शाजापूर – शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मर्णार्थ ऐतिहासिक आणि भव्यदिव्य ताजमहल उभारला हे सर्वांनाचा ठावूक आहे. त्यामुळे ताजमहलकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. मात्र मध्य प्रदेशात एका पतीने ताजमहलच्या एक पाऊल पुढे जात पत्नीच्या आठवणीत पत्नीचं मंदिरच उभारलं.
मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यात हे मंदिर आहे. येथील सांपखेडा गावात नारायण सिंह राठोड नावाचे गृहस्थ राहतात. त्यांच्या आयुष्यात संसर्गाची दुसरी लाट येण्याआधी सर्वकाही सुरळीत सुरू होतं. नारायण यांची पत्नी गीता या धार्मिक होत्या. त्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच हजेरी लावत असत. भजन-कीर्तन करत त्या भक्तित रममाण होत असत.
दुर्दैवाने करोनाच्या दुसऱ्या लाटेत गीता यांचं उपचारादरम्यान निधन झालं. 27 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गीता यांचं निधन पती नारायण राठोड आणि पुत्र संजय यांच्या जिव्हारी लागली. त्यांनी गीता यांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पुतळ्याची ऑर्डर दिली.
दरम्यान दीड महिन्यांनी त्यांना पुतळा तयार करून मिळाला. त्यानंतर त्यांनी घराच्या बाहेर दारातच एक मंदिर उभारलं. त्यात पुतळ्याची स्थापना केली. आता राठोड कुटुंबातील सदस्या त्या पुतळ्याचं रोज सकाळी दर्शन घेतात.