कराड -चव्हाणवाडी (धामणी, ता. पाटण) येथे युवकाला दांडक्याने मारहाण करत दगड डोक्यात घालून त्याचा खून केल्याप्रकरणी चव्हाणवाडी येथील राहुल उर्फ लक्ष्मण रामचंद्र जाधव यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांनी सुनावली. दंड न भरल्यास 6 महिने साध्या कैदेचीही शिक्षेत तरतूद केली आहे.
याबाबत अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ऍड. मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले की, अजित आनंदा देसाई हा युवक 6 नोव्हेंबर 2015 रोजी चव्हाणवाडी (धामणी) फाट्यापासून दुचाकीवरून चव्हाणवाडी गावाकडे निघाला होता. वाटेतच संशयित राहुल उर्फ लक्ष्मण जाधव झुडपामागे दबा धरून बसला होता. अजित देसाई दुचाकीवरून येत असल्याचे पाहून जाधवने वाटेतच त्याची दुचाकी अडवत त्याला गाडीवरच दांडक्याने मारहाण करून खाली पाडले.
त्यानंतर राहुलने मोठा दगड उचलून देसाई याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला. याप्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसआय एन. आर. चौखंडे व पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे या प्रकरणातील महत्त्वाचे 16 साक्षीदार तपासण्यात आले.
यामध्ये परिस्थितीजन्य पुराव्याच्या अनुषंगाने काही साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील ऍड. मिलिंद व्ही. कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेल्या साक्षीपुराव्यावरून न्यायाधीश व्ही.व्ही. कठारे यांनी राहुल जाधव याला दोषी धरून जन्मठेपेची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास 6 महिने साध्या कैदेचीही तरतूद या शिक्षेत करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयीन ड्युटीचे पोलीस हवालदार सौ. योगिता पवार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.