अमोल मतकर, संगमनेर
शहरात सय्यद बाबा चौक याठिकाणी आयोजित केलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी “कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख, दुश्मनी अच्छी नहीं मुझे दोस्त बनाके देख” या आशयाची त्यांनी शेरोशायरी करत नक्की कुणाला दोस्तीचा हात पुढे केला. याबाबत सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.
विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टिका करण्यासाठी प्रत्येक व्यासपीठ कमी पडते. कोणत्याही व्यासपीठावर एकमेकांवर सडकून टिका करतात. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर शहरात उरूसमध्ये आले. त्यांनी दर्ग्यावर चादर चढवून दर्शन घेतले. त्यानंतर ते कव्वालीच्या ठिकाणी आले. काहीवेळ कव्वाल्याही ऐकल्या. जावेद जहागिरदार यांनी त्यांचे स्वागत करत दोन शब्द बोलण्याचा आग्रह धरला असता. त्यांनी हिंदीमध्ये भाषण केले. दिल्लीहून आलेल्या कव्वाली गायकांची त्यांनी स्वागत केले. तसेच राज्याचा महसूल मंत्री झाल्यानंतर संगमनरमध्ये सत्कार केला तो क्षण माझ्यासाठी आनंद देणारा क्षण होता. भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले ” “कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख, दुश्मनी अच्छी नहीं मुझे दोस्त बनाके देख” या वाक्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. परंतु ही शायरी नेमकी कुणासाठी केली याबाबत संगमनेरमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, अमोल खताळ, जावेद जहागिरदार, शिरीष मुळे, रवींद्र थोरात, सोमनाथ कानवडे, राहुल भोईर आदींची उपस्थिती होती.