‘पत्रकारांसाठी म्हाडाअंतर्गत प्रकल्प’ – मुख्यमंत्री

पुणे – पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांचा सर्वात मोठा प्रश्‍न हा घरांचा आहे. त्यासाठी म्हाडाच्या अंतर्गत काही प्रकल्प खास पत्रकारांसाठी राबविता येतील काय याबाबत आम्ही आगामी काळात नक्कीच विचार करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. त्यांनी वास्तूच्या नूतनीकरणासाठी सहाय्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकारांचे अनेक प्रश्‍न आम्ही गेल्या साडेचार वर्षांत सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात पत्रकाराच्या पेन्शन योजनेचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. याशिवाय महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये सुद्धा आम्ही पत्रकारांना सामावून घेतले आहे.त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता या योजनेमार्फत मोफत उपचार मिळू शकणार आहेत. या योजनेचे कार्ड लवकरच सर्व पत्रकारांना देण्यात येणार आहेत. घरांचा प्रश्‍न सुद्धा सोडविण्यात येणार आहे. मुंबईच्या धर्तीवर म्हाडाच्या अंतर्गत एखादी योजना फक्‍त पत्रकारांसाठी सुद्धा राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो नेहमी समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत असतो, असे सांगितले. आभार चंद्रकांत हनचाटे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.