पिंपरी – उघड्या दरवाजातून घरात घुसून अज्ञात मारकऱ्याने झोपलेल्या दोन महिलांवर शस्त्राने वार केले. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना काळेवाडी, नढेनगर येथील तुळजाभवानी कॉलनीत शुक्रवारी (दि.16) पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50) असे या हल्ल्यात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी मयताचा मुलगा संतोष पांडुरंग गुंजाळ (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. दुहेरी खुनाच्या प्रयत्नाने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी नढेनगर येथील तुळजाभवानी कॉलनीतील जगदंबा पान स्टॉलमागे गुंजाळ कुटुंबीय राहते. फिर्यादीच्या सासू मंगल साहेबराव सत्वधर यादेखील त्यांच्याकडे राहण्यास आल्या होत्या. फिर्यादीचे वडील पांडुरंग गुंजाळ, आई छाया गुंजाळ, सासू मंगल सत्वधर हे सर्व जण घराच्या हॉलमध्ये झोपले होते. फिर्यादीची आजी सुंदराबाई भानुदास गुंजाळ या भाजीविक्रीचा व्यवसाय करतात.
नेहमीप्रमाणे सुंदराबाई या बुधवारी (दि.16) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भाजीविक्रीकरिता घरातून बाहेर पडल्या. यावेळी त्यांनी घराचा दरावाजा अर्धवट उघडा ठेवला होता. याचा फायदा घेत अज्ञात मारेकऱ्याने घरात घुसून झोपलेल्या छाया गुंजाळ व मंगल सत्वधर यांच्यावर हत्याराने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छाया गुंजाळ यांचा मृत्यू झाला. तर मंगल सत्वधर या गंभीर जखमी झाल्या आहेत.