इंदोरी – तळेगाव-चाकण रस्त्यावरील इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीपात्रात एक कार कोसळली. या अपघातात कारमधील व्यक्तीचाही मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
संजय पुनमचंद बोरसे (वय 43) रा.मनोहरनगर, तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे) असे अपघातातील मृताचे नाव आहे. एक कार नदीपात्रात पडली असून मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची खबर शुक्रवारी सकाळी पोलिसांना मिळाली. कार पाण्यात पडल्यानंतर दरवाजे बंद झाल्याने बोरसे हे कारच्या खिडकीतून बाहेर आले.
मात्र, त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना कार पाण्यात पडलेली आणि कारपासून काही अंतरावर नदीपात्रात एक मृतदेह दिसला. नागरिकांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली. बोरसे चाकण येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
शुक्रवारी मध्यरात्री बोरसे कंपनीतील काम संपल्यानंतर चाकणवरून तळेगावला घरी जात होते. दरम्यान, तळेगाव-चाकण रोडने जात असताना नदीपात्राच्या वळणावर त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीच्या पुलावरून पाण्यात पडली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने कार व संजय यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. दरम्यान मार्गावर वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गर्दी झाली होती.