नगर-पुणे रस्त्यावरील अपघातात एक ठार; चौघे जबर जखमी

 दोन तास वाहतुकीची कोंडी

नगर: नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सदर अपघातामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती.

कैलास अनिल ससाणे (रा. खंडेश्‍वरी, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, दुचाकी व टेम्पोच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगातील आणखी दोन वाहने धडकली. या धडकेत तीन जण जखमी झाले. अपघातग्रस्त तीन ते चार वाहने रस्त्यावरच उभी असल्याने नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली.

अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले व अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. नगर-पुणे रस्त्यावरील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने दुसऱ्या बाजूवरील वाहतूक अस्ताव्यस्त होऊन सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. नगर तालुका पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

बराच वेळ वाहतूक खोळंबल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.