फलटण – विडणी, ता. फलटण येथे 30 वर्षे वयाच्या पुरुषाचा खून करून, त्याचा मृतदेह नीरा उजवा कालव्यात टाकण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, विडणी, ता. फलटण येथे नीरा उजवा कालव्यावरील पुलाच्या शेजारीच लिफ्ट क्र. 2 येथे मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास पूर्ण बाह्यांचा निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद आणि फिकट काळ्या रंगाची आडव्या पट्ट्या असलेली पॅंट, असे कपडे असलेल्या अंदाजे 30 वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह पाइपला अडकलेला स्थानिकांना दिसला.
या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलीस पाटील सौ. शीतल नेरकर यांना दिली. सौ. नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी विडणीचे सरपंच सागर अभंग, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रवीण नाळे व स्थानिकांच्या सहकार्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या व्यक्तीचा खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हातपाय जाड दोरीने बांधून कालव्यात टाकून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस पाटील सौ. शीतल नेरकर यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करत आहेत. या व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.