मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं विधान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यासंबंधी विचारले असता त्यांनी त्यांनाच विचारा असे सांगत उत्तर देणे टाळले. तसेच युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत असले, काही लोकांची मागणी असली तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही आहे असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
राज्यातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु असून पातळी खालावली असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, काय बोलावे हेच कळत नाही. आम्ही जो काळ अनुभवलेला आहे त्यावेळी काही परंपरा, इतिहास, संकल्पना आणि काही संकेत पाळून बोलत होतो. आज ते कमी झाले आहे. याच्यातूनही ते सुधारतील अशी अशा आहे.
शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी संबंधित वक्तव्य केले.
.