मुंबई – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारमधीलच काही नेत्यांचा प्रखर विरोध होता. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ओबीसीतील कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्याविरोधात शड्डू ठोकला होता. आता सरकारनेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचना काढली आहे. यावरून नारायण राणे यांनी एक्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. सोमवारी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया देखील राणे यांनी दिली आहे.
भाजपाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केला. कोकणातील व अन्यत्रही कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत व आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला त्याचा फटका बसू नये, यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचे म्हटले जात होते.