मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. या प्रकरणामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवजयंतीच्या निमित्ताने संजय राऊतांनी केंद्र सरकारवर आणि पर्यायाने भाजपावर सडकून टीका केली आहे. “दिल्लीनं इकडचे लोक फितुर केले असून ते आमच्या मराठी बाण्यावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत”, असे राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी यावेळी शिवाजी महाराजांचे उदाहरण देताना आपण दिल्लीसमोर झुकणार नसल्याचे प्रतिपादन केले आहे. “छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला, ती म्हणजे स्वाभिमान. मरण पत्करेन, पण शरण जाणार नाही हा जो बाणा शिवरायांचा आहे, तो महाराष्ट्रानं कायम जपला. आजही आम्ही दिल्लीसमोर ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत. दिल्लीपुढे झुकणार नाही आणि शरण जाणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
“तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज दुसरे कुणी असतील. दिल्लीनं कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा हा प्रयत्न झाला, तेव्हा महाराष्ट्रानं उसळून म्यानातून तलवार काढून लढा दिला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्र लढतोय. त्या काळातही महाराष्ट्रातलेच काही फितुर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते. शिवरायांविरोधात कारस्थानं करत होते. आजही नेमकी तीच परिस्थिती आहे”, असेही राऊत म्हणाले.
“दिल्लीनं इकडचेच लोक फितुर केले आहेत. ते फितुर, बेईमान लोक आमच्या मराठी बाण्यावर, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत. पण तरीही महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्र लढत राहील. हा सह्याद्री आहे. हिमालयाच्या बरोबरीने लढत राहील. हिमालयाचं रक्षण करणं सह्याद्रीचं प्रथम कर्तव्य आम्ही मानतो. कुणी महाराष्ट्राला कमजोर करत असेल, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा”, असं राऊत म्हणाले.
“आजही औरंगजेब, सूर्याजी पिसाळ, जयचंद आहेत. ते महाराष्ट्रातच आहेत. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही प्रिय आहेत. ज्यांनी मुंबईतल्या शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध केला, असे लोक औरंगजेबाचे इथले हत्यार आहेत. हे महाराष्ट्रद्रोही. त्यांच्या पाठिशी इथले गद्दार आणि दिल्लीतं तख्त उभं आहे. आणि हे तख्त फोडण्याची ताकद महाराष्ट्रात आहे”, असा इशारा राऊतांनी यावेळी बोलताना दिला.