- भाजपा आक्रमक भूमिकेत, तर मनसे “कोसोदूर’
पिंपरी – एक डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवलली आहे. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी पूर्णपणे बॅकफूटवर गेली आहे. निवडणुकीसाठी मनसेचा उमेदवार असताना शहर पातळीवर हा पक्ष निवडणुकीपासून कोसोदूर आहे. राष्ट्रवादी आणि भाजपात अटीतटीचा सामना होताना राष्ट्रवादीची “गलितगात्र’ भूमिका चर्चेचा विषय बनली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघामधून दोन वेळा विजय मिळविला होता. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा वर्षभरापासून रिक्त होती. येत्या 1 डिसेंबर रोजी या जागेसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. 12 नोव्हेंबर हा अर्ज करण्याचा अंतिम दिवस तर 13 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी झाली आहे. मंगळवार दि. 17 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मंगळवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी पदवीधरसाठी भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांच्यामध्ये थेट आणि अटीतटीची लढत होणार आहे. संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे हे देखील ताकदीने या निवडणुकीत उतरले आहेत.
ऐन करोनाकाळात होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपाचे आपल्या ताब्यातील जागा आपल्याकडेच रहावी यासाठी गेल्या चार महिन्यांपासून मतदार नोंदणीमध्ये आघाडी घेतली होती. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधरसाठी 33 हजार मतदारांची नोंदणी झाली असून, अंतिम मतदारयादी उद्या (दि. 16) प्रसिद्ध होणार आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 25 हजारांहून अधिक मतदार नोंदल्यामुळे या पक्षाचे शहरपातळीवर तरी पारडे अधिक जड मानले जात आहे.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा आणि मनसेचा अधिकृत उमेदवार असला तरी या दोन्ही पक्षांनी मतदार नोंदणीसाठी “साधा’ सहभागही न दाखविल्यामुळे या पक्षाचे हक्काचे असे मतदारच शहरत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीला ही निवडणूक जिंकायची असली तरी शहर पातळीवरील नगरसेवक, पदाधिकारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नकारात्मक भूमिकेचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची भीती व्यक्त होत आहे. 36 नगरसेवक, शेकडो पदाधिकारी, एक आमदार, माजी आमदार अशी फौज असतानाही पदवीधरसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहराध्यक्षच मतदार नाहीत
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मनसेचे सचिन चिखले यांच्या पक्षाचे पदवीधरसाठी अधिकृत उमेदवार असताना हे दोन्ही शहराध्यक्षांनी आपले पदवीधरसाठी नाव नोंदलेले नाही. उमेदवाराला विजयी करण्याच्या वल्गना करणारे शहराध्यक्षच मतदार नसतील तर त्यांच्या उमेदवाराची अवस्था काय असू शकेल याचा विचारच न केलेला बरा, अशी प्रतिक्रिया सध्या शहर पातळीवर उमटत आहे.
पार्थ पवारांचेही दुर्लक्ष
पार्थ पवार यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी देण्याबाबत सध्या राष्ट्रवादीमध्ये गांभीर्याने विचार सुरू आहे. पदवीधरमध्ये मतदारनोंदणी आणि शहरातून आपल्या उमेदवाराला आघाडी देण्याची संधी त्यांच्याकडे असताना त्यांनी ही संधी गमाविल्याची चर्चाही शहरात रंगली आहे. पार्थ पवार यांना शहराचे नेतृत्व तर करायचे असताना पक्षीय पातळीवरील बांधणीकडे त्यांचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
शिवसेना, कॉंग्रेसचीही अवस्था दयनिय
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उमेदवार म्हणून अरुण लाड हे मैदानात आहेत. असे असताना शिवसेनेनेही पदवीधरच्या निवडणुकीकडे केलेले दुर्लक्ष महत्त्वाचा विषय ठरला आहे. शहर पातळीवर कॉंग्रेसचे संगठण संपुष्टात आल्याच्या बरोबर आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूमिका आश्चर्यकारक आहेत. विशेष म्हणजे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनीदेखील पदवीधरसाठी नाव नोंदणी केली नसल्याची बाब समोर आली आहे.