ओंकार पाटील यांच्या पुस्तकामुळे नवा ग्राहक कायदा सर्वांना समजेल

न्या. मिलिंद पवार : "वर्ष 2019 चा ग्राहक कायदा' पुस्तकाचे साताऱ्यात प्रकाशन

सातारा – ग्राहकांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव व्हावी यासाठी ग्राहक कायदा 2019 याची रचना केली आहे. विधिज्ञ ओमकार पाटील यांनी या कायद्याचा मसुदा, त्याची माहिती आणि कायद्यासंदर्भात अत्यंत सुंदर सुलभ सोप्या मराठीत भाषांतर करून ग्राहकांना जागृत केलं आहे. ओंकार पाटील यांचे हे कार्य आणि पुस्तक नक्कीच कौतुकास्पद आहे यात शंका नाही; असे उद्गार ग्राहक न्यायालयाचे न्या. मिलिंद पवार यांनी काढले.

“वर्ष 2019 चा ग्राहक कायदा’ या ऍड. ओंकार पाटील लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा न्या. पवार यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय येथे संपन्न झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर सातारा आकाशवाणीचे अधिकारी सचिन प्रभुणे आणि ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन पतकी उपस्थित होते.

न्या. पवार पुढे म्हणाले की, ग्राहक कायदा हा ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्या ग्राहक कायद्यामध्ये अनेक सुधारणा केल्या असून त्याची व्याप्ती वाढवली आहे. पूर्वी ज्या जागी अर्थात बाजारपेठेत खरेदी केली जायची, त्या क्षेत्रातील ग्राहक न्यायालयाकडे दाद मागावी लागत असे. आता हे बंधन संपले असून ग्राहक कोठूनही झालेल्या फसवणुकीच्या विरोधात दाद मागू शकतो. तसेच ग्राहक न्यायालयात दाद मागण्यासाठी वकिलांची आवश्‍यकता असतेच, असे बंधन नाही. न्यायालय ग्राहकाला योग्य ते मार्गदर्शन करते. तसेच माहिती आणि केस चालवण्यासाठी सहकार्य करत असते.

सचिन प्रभुणे यांनी या पुस्तकात आकाशवाणीचा सहभाग असल्याचे नमूद करत सर्वसामान्य ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव या कायद्यामुळे होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी टोल नाका तसेच नगरपालिकांच्या टॅक्‍स वसुलीनंतर सेवा देण्याबाबत प्रश्न उपस्थित करून ग्राहक कायद्यानुसार मोठ-मोठे बिल्डर सही ग्राहकांना योग्य ती सेवा आणि कायदेशीर बाबी तातडीने पूर्ण करून देत असल्याचा अनुभव कथन केला.

नवा ग्राहक कायदा म्हणजे ग्राहकांचे कवचकुंडल असून जागतिकीकरणामुळे ग्राहक जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे अशा परिस्थितीत ग्राहकांच्या संरक्षणासाठी देशांतर्गत झालेला हा कायदा ग्राहकांना त्यांचे हक्क मिळवून देईल असे सांगून मधुसूदन पत्की यांनी म्हणाले की, ग्राहक तसेच विक्रेते यांनी विवेकाचे भान ठेवून व्यवहार तक्रारी केल्या पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी ग्राहक कायद्यामुळे ग्राहकांना मिळालेल्या नुकसानभरपाईचे किस्से सांगून या कायद्याची आवश्‍यकता तसेच गैरप्रकार करणाऱ्यांना धाक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ओमकार पाटील यांनी प्रास्तविक आणि सूत्रसंचालन केले. याप्रसंगी ऍड. कालिदास माने आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.