ब्रुसेल्स – करोनाचे संकट प्रदीर्घ काळापासून सुरू असल्याचा फटका आता सलग दुसऱ्यावर्षीही “न्यू इयर’च्या आनंदोत्सवाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाचे सेलिब्रेशनही धोक्यात आल्याचे चित्र जगभर निर्माण झाले आहे. अनेक देशांच्या सरकारांनी आता ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी नव्या निर्बंधांचा विचार करायला सुरुवात केली आहे.
फ्रेंच सरकार आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ओमायक्रॉनच्या नवीन संसर्गाच्या डाटाचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी निर्बंधांचा निर्णय घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार जरी वेगाने होत असला तरी तो पूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा सौम्य असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे पुन्हा जनतेच्या आनंदावर विरजण घालायचे की नाही याचा विचार केला जातो आहे.
बेल्जियममध्ये “न्यू इयर’च्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी शॉपिंग मॉल आणि थिएटर बंद केली गेली आहेत.
जगभराचे आकर्षण असलेली ब्रुसेल्समधील नवीन वर्षाच्या स्वागतासाठीची आतषबाजीही रद्द करण्यात आली आहे. ब्रिटनमध्येही असेच निर्बंध घातले जाऊ लागले आहेत. नॉदर्न आयलंड आणि वेल्समध्ये हे निर्बंध अगोदरच घातले गेले आहेत. पोलंडने नाईट क्लब बंद केले आहेत. तर इटलीमध्ये खासगी एकत्रीकरणांना परवानगी दिली आहे. “न्यू इयर’साठी उघड्यावरील एकत्रीकरणांना निर्बंध पाळावे लागतील असे म्हटले गेले आहे. नेदरलॅंडमध्येच फक्त याला अपवाद असून तेथे अनावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद करण्याचे निर्बंध दिले आहेत.