मुंबई – महाराष्ट्रात आज (शनिवारी) करोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हॅरियंटचा पहिला रुग्ण आढळला. हा ३३ वर्षीय तरुण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आला होता. २४ नोव्हेंबरला तो मुंबई येथे आल्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यावेळी त्याला सौम्य ताप वगळता इतर कोणतेही लक्षण जाणवत नव्हते. ऍट रिस्क देशांतून प्रवास केला असल्याने त्याचे सॅम्पल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. आज (शनिवारी) या रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा झाला असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे.
आठ प्रवाशांच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह
दरम्यान, १ डिसेंबरपासून मुंबईत हवाईमार्गे दाखल झालेल्या एकूण आठ प्रवाशांच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. या सर्वांचे नमुने सध्या जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ८ रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीचे निष्कर्ष येणार असल्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय करोना बधितास ओमायक्रॉन नाही
झाम्बिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७.१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे.