नवी दिल्ली – मैत्रीवर अनेक चित्रपट आलेत. मग ती मुलांची मैत्री असो वा मुलगी आणि मुलाची. मैत्री ती मैत्रीच. नातेवाईक, जवळचे साथ सोडतात तेव्हा अनेकदा मित्र परिणामाची चिंता न करता साथ देतात. मित्रांसाठी काहीही करण्यासाठी मित्र सहज तयार होतात. असाच काहीसा किस्सा समोर आला असून काही मित्रांनी आपल्या मृत मित्राचा मृतदेह कबरीतून बाहेर काढत, शहरभर फिरवला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्विटोमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही मित्रांनी आपल्या एका मृत मित्राचा मृतदेह कबर खोदून बाहेर काढला. यासाठी मृत एरिक सेडेनोच्या आई-वडिलांची परवानगी घेतल्याचा दावा मित्रांनी केला आहे.
या घटनेत सात मित्रांचा समावेश होता. या सात जणांनी मृत एरिकचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर निर्जीव मृतदेहाला बाईकवर बसवून शहरात फिरवण्यात आलं. हे मित्र नेहमी ग्रुपने बाईकवर फिरत होते. अगदी त्याच पद्धतीने सर्व मित्रांनी एरिकचा मृतदेह बाईकवर फिरवला.
संबंधित मित्रांना या अजब प्रकाराविषय़ी विचारलं असतं, ते म्हणाले की, आम्हाला एरिकला श्रद्धांजली द्यायची होती. ही त्याची शेवटची इच्छा होती. त्याला अशाचप्रकारे निरोप द्यायचा होता, असंही ते म्हणाले.
एरिकचा मृत्यू गेल्या आठवड्यात झाला होता. एरिक त्याच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीला जात होता. त्याचवेळी अज्ञाताने त्याच्यावर गोळी झाडली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच वय 21 वर्षे होतं.