कलंदर: “ओली’ दिवाळी”

उत्तम पिंगळे
पावसाने अगदी कहरच केला होता.निवडणुकीचा प्रचार व अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत वरुणराजाने सर्वच राजकारण्यांची अगदी गोची केली होती. राजकारण्यांचे लक्ष प्रचार व निवडणुकीकडे व सामान्य लोकांचे दिवाळीकडे. राजकीय कार्यकर्त्यांना तर प्रचाराकडे लक्ष घालावयासच हवे होते त्यामुळे दिवाळीची लगबग हवी तशी दिसत नव्हती. पावसाळासुद्धा अगदी आता जून ते सप्टेंबर ऐवजी जुलै ते ऑक्‍टोबर असतो का असे वाटायला लागले आहे. यावेळी आपल्याला आठवत असेल की जून महिना जवळजवळ कोरडाच गेला होता. त्यानंतर नवरात्रही पावसात गेली व आता अगदी दिवाऴीच्या तोंडावरही पाऊस उभा ठाकला आहे असेच वाटते.

एकुणात निसर्गाचे चक्र बदलले आहे व त्याला शेवटी आपणच जबाबदार आहोत. मला आठवते आमच्या बालपणी दिवाळीत सकाळी उठून आंघोळ करायची म्हणजे कठीण काम वाटायचे कारण थंडी असायची. आता एकंदरीतच थंडी कमी होत असून उन्हाळा वाढत चालला आहे. असो, तर आता दिवाळी एकूणच “पावसाळलेली’ वाटत आहे. पण आज 24 तारीख व सगळ्यांचेच राजकीय भोपळे आज फुटणार आहेत. कित्येकांची दिवाळी होणार तर कित्येकांचे दिवाळे वाजणार आहे म्हणून ही दिवाळी ओलीच राहणार आहे. आता एक्‍झिट पोलमध्ये महाराष्ट्र व हरियाणा या दोनही राज्यांच्या निकालाचा कल दिसलाच आहे व आज दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मग कोण तरला, कोण बुडाला हे स्पष्ट होणार आहे.

पहिल्या प्रकारात सरकार पक्षाचे निवडून आलेले नेते खूपच खुशीत राहणार कारण हे तर स्वतः विजयी व आपल्या पक्षाचे सरकार म्हणजे सरकार दरबारात वजन राहणार. मग कार्यकर्त्यांना बोलावून श्रमपरिहार म्हणून त्यांच्यासह ‘बसून’ जोरदार दिवाळीची पार्टी साजरी होईल व ही दिवाळी त्यामुळे ‘ओलीच’ होणार. दुसऱ्या प्रकारात पक्ष जिंकला पण स्वतः हरला म्हणजे कठीण, कारण पक्षात जिंकल्यावरही पदासाठी अनेक दावेदार असतात, तिथे कोण विचारणार? मग यावर फुंकर घालण्यासाठी कार्यकर्त्यांचे संमेलन बोलावले जाईल आणि पार्टी केली जाईल. मग स्वतःच दुःख कुठेतरी बुडवावे लागेल म्हणून त्यांचीही दिवाळी ‘ओलीच’ होणार.

तिसरा प्रकारामध्ये पक्ष हरला पण आपण जिंकलो म्हणजे आमदार तर झालो आहे, पद असेल तर कार्यकर्त्यांची वानवा नसते व त्यांना खूश ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मग असे असताना विरोधी पक्षात का असेना पण आमदार म्हणून आपला आनंद मग कार्यकर्त्यांबरोबर ‘बसून’ साजरा करावा लागणार म्हणून त्यांचीही दिवाळी ‘ओलीच’ राहणार आणि सर्वात शेवटी तेलही गेले तूपही गेले म्हणजे सरकारही नाही व स्वतःही विजयी न होणे अशा वेळी जर ती व्यक्‍ती अगोदर आमदार असेल तर जास्त झळ बसणार. मग आहे त्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवणे महत्त्वाचे म्हणून त्यांना बरोबर घेऊन ‘बसावे’ लागेल म्हणून त्यांचीही दिवाळी ‘ओलीच’.

खूपसे अपक्ष निवडून आले ते खूशच राहणार कारण ते कुठेही जाऊ शकतात. बंडखोरही खूश होणार कारण बहुतेकांच्या बाबतीत नरमाईचे धोरण घेऊन पुन्हा त्यांना पावन केले जाईल. मग त्यांचीही दिवाळी कार्यकर्त्यांबरोर ‘बसून’ जोरदार होईल. म्हणूनच मी प्रथमपासूनच लिहीत आहे की एकीकडे निसर्गाचा समतोल बिघडून दिवाळीवर पावसाचे सावट आहे व आज निकाल लागून निवडणूक सांगता होऊन सर्व राजकीय नेते जिंकलेले, पडलेले व त्यांचे कार्यकर्ते श्रमपरिहार साजरा करणार म्हणूनच सर्वांचीच ‘ओली’ दिवाळी होणार.
ता.क. येथे एकत्रित ‘बसून’ वा ‘बसणे’ वा ‘ओली’ हे चहापाण्यासंदर्भात लिहिलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.