तिकिट दरात 10 टक्के हंगामी वाढ

दिवाळीच्या सुट्टीत 3500 जादा बसेस सोडणार

मुंबई (प्रतिनिधी) – दिवाळीच्या सुट्टीत गावी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे होणारी वाढती गर्दी आणि खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळ 24 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबर यादरम्यान 3500 जादा बसेस सोडणार आहे. यामध्ये साधी, हिरकणी व शिवशाही बसेसचाही समावेश आहे. दरम्यान, प्रतिवर्षाप्रमाणे या हंगामातही 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 24 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई बाहेर जाण्याचा अनेक कुटुंबाचा बेत असतो. खासगी प्रवासी वाहतुकीच्या वाढत्या दरामुळे अनेक प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता 24 ऑक्‍टोंबर ते 05 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3,500 बसेस सोडण्यात येणार आहेत. या लांब पल्ल्याच्या जादा वाहतूकीबरोबरच स्थानिक स्तरावर आवश्‍यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्‌यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 10 टक्के भाडेवाढ 24 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

ही भाडेवाढ 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) या बसेसला लागू राहील. ही भाडेवाढ शिवशाही (शयनयान), शिवनेरी व अश्वमेध या बसेसला लागू होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.