मुंबई – ब्लॅक ऍन्ड व्हाईट जमान्यातील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. 1950 च्या दशकातील “आन’, “बरसात’ आणि “दीदार’सारख्या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.
त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. गेले वर्षभर त्यांना अधूनमधून रुग्णालयात दाखल करावे लागत होते. श्वसनाला त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांना जुहूतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
आज दुपारी 4 च्या सुमारास भायखळ्यातील रेहमताबाद दफनभूमीमध्ये निम्मी यांच्यावर दफनविधी करण्यात आले. त्यावेळी फारच थोडे निकटवर्तीय उपस्थित होते, असे त्यांच्या कुटुंबातील सूत्राने सांगितले.
नवाब बानू असे निम्मी यांचे मूळ नाव होते. राज कपूर यांनी त्यांचे “निम्मी’ असे नामकरण केले होते. राज कपूर यांच्या “अंदाज’मधून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर 1949 मध्ये “बरसात’ मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही.
निम्मी यांनी राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद आणि अशोककुमार यांच्यासह त्यांच्या काळातील प्रमुख कलाकारांसोबत काम केले. “सजा’, “आन’, “उडन खटोला’, “भाई-भाई’, “कुंदन’, “मेरे मेहबूब’, “पूजा के फूल’, “आकाशदीप’ आणि सर्वात शेवटी “लव्ह अँड गॉड’ आदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. लेखक-दिग्दर्शक एस.अली राजा यांच्याबरोबर विवाह झाल्यावर निम्मी यांनी अभिनय क्षेत्र सोडून दिले होते.