तपासणीनंतर उद्या घरी सोडणार; 14 पैकी 11 जण ठणठणीत
पुणे – करोनाची लागण झालेल्या शहरातील 19 मधील 5 जणांना गेल्या 24 तासांत घरी सोडण्यात आले आहे. तर आणखी 3 जणांचा 14 दिवसांचे विलगीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या 15 दिवसांनंतरच्या करोनाची तपासणी करून त्यांना पुढील 2 दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, पाच जण घरी सोडण्यात आल्यानंतर शहरात आता 14 करोनाचे रुग्ण असून त्यातील तिघांवर खासगी, तर 11 जणांवर डॉ. नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच यातील 11 जणांची प्रकृती ठणठणीत असून 2 जण आयसीयूमध्ये आहेत.
शहरात 9 मार्च रोजी करोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर शहरात 24 मार्चपर्यंत 19 रुग्ण सापडले असून, त्यातील 16 जण शहरातील तर 3 जण जिल्ह्यातील आहेत. त्यातील 5 जणांना घरी सोडण्यात आले आहे. या सर्वांवर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, 2 अत्यवस्थ रुग्ण वगळता सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. तर यातील सर्व रुग्णावर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर 3 जण खासगी रुग्णालयात आहेत. त्यातील 2 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असले, तरी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
“त्या’ महिलेच्या प्रकृतीत सुधारणा
भारती हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या 41 वर्षीय महिलेच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. ही महिला अत्यवस्थ असताना तिला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या उपचाराचा खर्च महापालिका देणार असून सर्व आवश्यक उपचार देण्याची विनंती महापौरांसह आरोग्य विभागाने भारती हॉस्पिटल प्रशासनाला केली आहे. तर, भारती हॉस्पिटल प्रशासनही सर्वतोपरी प्रयत्न आहे. त्यातच या महिलेला पूर्वीचे कोणतेही दुर्धर आजार नसल्याने या महिलेची प्रकृती उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.