मागील 48 तासांत एकही मृत्यू नाही
पुणे – शहरात करोनामुळे मागील दहा दिवसांपासून सुरू असलेला मृत्यूचा कहर काहीसा कमी झाला आहे. मात्र, दुसरीकडे बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात 80 नवीन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखी वाढली आहे.
मागील 48 तासांत ससून रुग्णालयासह अन्य कोणत्याही रुग्णालयात करोनाने मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. ही दिलासा देणारी माहिती असून, किमान मृत्यूचा कहर तरी किमान झाला, आता बाधितांची संख्या कमी होणे हेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेत आतापर्यंत 640 जण बाधित सापडले असून, त्यातील 53 जणांना उपचार देऊन सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.तर 48 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 57 बाधित सापडले असून 19 जणांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण 51 बाधित रुग्ण सापडले असून, 6 जणांना घरी सोडले आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. 44 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान, ससून रुग्णालयात 11 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांनाही बरे करण्यासाठी डॉक्टरांचा प्रयत्न सुरू आहे. आज दिवसभरात ससून रुग्णालयातील तीन जणांना घरी सोडण्यात आले.