वॉशिंग्टन : 24 तासांच्या कालावधीमध्ये तब्बल 26 हजार 100 वेळा उठाबशा काढण्याचा विक्रम इलिनोईसमधील एका माणसाच्या नावावर नोंदला गेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी त्याने हा विक्रम केला. गिनीज बुकने त्याची दखल घेतली आहे.
टोनी पिरॅनिओ असे या माणसाचे नाव आहे. या पूर्वी असलेला 24 तासात 25 हजार उठा बषांचा विक्रम मोडण्यासाठी त्याने हा उपक्रम केला. 24 तासात 25 हजार पेक्षा जास्त उठाबशा काढण्याचा त्याचा उद्देश होता. प्रत्यक्षात त्याने 26100 उठाबशा काढल्या आणि गिनीज बुक ला त्याच्या या रेकॉर्डची नोंद घ्यावी लागली. रोड्स आयलँड या देशातील जो रेवरडेस याने 2020 मध्ये 24 तासात 25 हजार उठा बशा काढण्याचा विक्रम केला त्याचा विक्रम मोडण्याचा पराक्रम टोनीने केला आहे.
गेल्या गुरुवारी पहाटे पाच वाजता त्याने या विक्रमाला सुरुवात केली. शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत त्याने 26100 उठा बशा काढल्या होत्या. दर 22 उठा बशा नंतर 30 सेकंदांचा एक ब्रेक तो घेत होता. या विक्रमाचे रेकॉर्डिंग करण्यात आले असून गिनीज बुक अधिकारी त्याची तपासणी करत आहेत.
लवकरच त्याला या विक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हा विक्रम करण्यामागे टोनीचा आणखीन एक उद्देश होता. तो म्हणजे स्थानिक पातळीवरील एका रुग्णालयाला आर्थिक मदत व्हावी या हेतूने त्याने हा विक्रम केला यावेळी जमा झालेला निधी त्याने या रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला आहे.