मुंढवा, दि. 13 (प्रतिनिधी) -मुंढवा-केशवनगर मुख्य रस्त्याच्या दुरूस्तीसह अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने करावीत, वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकामी ठोस उपाय योजना कराव्यात, अशा सूचना आमदार चेतन तुपे यांनी यांनी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार तातडीने उपाय योजना केल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. परंतु, आमदारांच्या सुचनांनंतर आज 15 दिवसांनंतरही कोणतीही ठोस कामे करण्यात आलेली नाहीत. आमदारांनी सूचना करूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनीही प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मुंढवा-केशवनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी तसेच रूंदीकरण आदी प्रश्नांबाबत आमदार चेतन तुपे, माजी नगरसेविका पूजा कोद्रे यांच्या अध्यक्षतेखाली “तुलसी हॉल’ येथे विशेष बैठकीचे आयोजन (दि.29 सप्टेंबर) करण्यात आले होते. या बैठकीस वाहतूक पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, मुंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, माजी नगरसेवक बंडू गायकवाड, जितिन कांबळे, बाळासाहेब कोद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी रस्ता रूंदीकरणासाठी दिलेल्या आमच्या जागा परत द्या. 120 कोटी रुपये टॅक्स घेऊन पालिकेला काय देते? पर्यायी रस्ते कोण करणार? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार नागरिकांवर अधिकाऱ्यांवर केला होता. त्यावेळी आमदार तुपे यांनी नागरिकांना शांत करीत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत रस्ते, वाहतूक कोंडी या संदर्भातील कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. संबंधीत अधिकाऱ्यांनीही विविध उपाय योजना मांडत सदर कामे वेगाने केली जातील, असे ठामपणे आमदारांना सांगितले होते. परंतु, आज 15 दिवसांनंतरही येथील एकही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे नागरिकांना प्रशासकीय कामासह संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली असून उपाययोजनांची मागणी केली आहे.
खड्ड्यांचे इन्स्ट्राग्रामवर रिल…
मुंढवा रेल्वे उड्डाणपूलाजवळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे आता सोशल मीडीयावरही व्हायरल झाले आहेत. तरुणांना इन्स्ट्राग्राम वर या खड्डांचे खिल्ली उडविणारे रील तयार केले आहेत. काही तरुणांनी तर मुंढवा चौकात “रोप-वे’ तयार करावा, अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्या आहेत. तर काहींनी येथील रस्ते किती सुंदर आणि सुशोभित आहेत, अशी मिस्किल टिपण्णी करणारे व्हिडीओ व्हायरल केले आहेत.